अशोक खरातप्रकरणी एका जुन्या कागदपत्राने रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. अशोक खरातच्या वडिलांच्या निधनानंतरची २०१७ मधील त्यांच्या दशक्रिया पत्रिकेचा एक फोटो समोर आला आहे.
ज्यात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे नाव शोकाकुल म्हणून छापण्यात आल्याचे समोर आले आहे. अशोक खरातचे वडील कै. एकनाथ त्र्यंबक खरात यांच्या निधनानिमित्त ही पत्रिका छापण्यात आली होती.
सध्या ही दशक्रिया पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या पत्रिकेच्या सर्वात खाली असलेल्या शोकाकुल यादीत रूपाली चाकणकर यांचे नाव ठळकपणे पाहायला मिळत आहे. एका भोंदू बाबाच्या घरगुती कार्यक्रमाच्या पत्रिकेवर मोठ्या राजकीय नेत्याचे नाव असल्याने अनेक सवाल उपस्थित होत आहेत.
दरम्यान, अशोक खरात विरोधात एका महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर अनेक गंभीर आरोप समोर येऊ लागले. खरातसोबतचे काही फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी रुपाली चाकणकर यांच्यावर जोरदार टीका केली होती.
या वाढत्या दबावामुळे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.सध्या या प्रकरणात अशोक खरात विरोधात एकूण आठ गुन्हे दाखल असून, हे सर्व गंभीर स्वरूपाचे आहेत. न्यायालयाने त्याच्या पोलीस कोठडीतही वाढ केली आहे.
या पार्श्वभूमीवर आता ट्रस्टमधील सर्व सदस्यांची चौकशी होणार असल्याने प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अशोक खरात हा सिन्नर तालुक्यातील मीरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर आणि शिवानिका संस्थानाचा संस्थापक म्हणून ओळखला जातो. स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरातवर फसवणूक आणि भोंदूगिरीचे गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.












