पुणे प्रतिनिधी : उमेश अहिरे
दक्षिण पुण्यातील गुजरवाडी येथे ‘ॐ गणेश तरुण मंडळ’ यांच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री राम जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. बुधवारपासून सुरू झालेल्या या उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी, बुधवारी (२५ मार्च) ‘जय श्री राम’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी संत मीराबाई महिला भजनी मंडळाच्या वतीने हरिपाठ सेवा अर्पण करण्यात आली. त्यानंतर ह.भ.प. स्वराज महाराज शेंडकर यांनी आपल्या रसाळ वाणीतून प्रवचन सेवा दिली. रात्रीच्या सत्रात ह.भ.प. दत्तात्रय महाराज धुमाळ यांचे कीर्तन झाले, ज्यातून त्यांनी रामनामाचा महिमा भाविकांना सांगितला. गुरुवारी (२६ मार्च) राम जन्माच्या दिवशी पहाटे ५ ते ७ या वेळेत काकड आरती करण्यात आली. त्यानंतर श्री रामांची भव्य पालखी मिरवणूक पारंपरिक पद्धतीने वाजत-गाजत गावातून काढण्यात आली.
यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पखवाज वादक ह.भ.प. दीपक महाराज दसवडकर यांची कीर्तन सेवा पार पडली. त्यांच्या पखवाजाच्या साथीने आणि सुश्राव्य कीर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. पाळणा आणि महाप्रसाद दुपारी ठीक १२ वाजता प्रभू श्री रामांचा जन्मोत्सव सोहळा पार पडला. यावेळी गावातील महिला, पुरुष आणि बालकांनी एकत्रितपणे श्री रामांचा पाळणा गायला. फुलांची उधळण आणि ‘सियावर रामचंद्र की जय’च्या घोषणांनी वातावरण प्रफुल्लित झाले होते. कार्यक्रमाची सांगता भव्य महाप्रसादाने करण्यात आली. ओम तरुण मंडळ गुजरवाडी च्या वतीने आयोजित या सोहळ्यासाठी गुजरवाडीसह परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. सासवड येथील पसायदान वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सेवेचे ग्रामस्थांकडून विशेष कौतुक करण्यात आले. शिस्तबद्ध नियोजन आणि भक्तीचा ओलावा यामुळे हा सोहळा पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या स्मरणात राहणारा ठरला.











