गजबजलेल्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एक व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नोकरी गेल्याच्या नैराश्यातून ४१ वर्षीय आदीत्य सातपुते यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार केल्याचे समोर आले आहे.
ही घटना रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घडली. वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
काय घडलं नेमकं?
आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरीवरली परिसरातील रहिवासी असून सध्या पुण्यातील भोसले नगर येथे वास्तव्यास होते. नोकरी गमावल्यानंतर ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातून त्यांनी एफसी रोडवरील खाऊ गल्लीत स्वतःच्या हाताने गळ्यावर ब्लेडने वार केले.
घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी अवस्थेत असलेल्या सातपुते यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले.सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनतर पुढील तपास पोलिसांनी सुरु केला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून सातपुते यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस नेमके कारण काय आहे, याचाही तपास करत आहे.












