तालुक्यातील विविध भागात ता.३० मार्च रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. यामध्ये शेतातील पिकांसह फळबागांचे नुकसान झाले अहे.तसेच अनेक भागात वीज पुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती आहे.
सोमवारी काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार सोमवारी जळगाव जामोद तालुक्यात हवामानात बदल दिसून आला.सायंकाळी वातावरणात बदल होऊन ६.३० वाजतानंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली.
या वादळामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच तालुक्यात विविध भागात जोरदार अवकाळी पाऊस बरसला.दरम्यान वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. तर शहरातील वीज पुरवठाही विस्कळीत झाला होता.
या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील अनेक गावात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांना मोठा फटका बसला आहे.सोबतच आंबा, केळी, संत्रा आदी फळबागांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून शेतातच कडबा आणि कुट्टी रचून ठेवले होते, त्यांचे मोठे नुकसान अवकाळी पावसामुळे झाले.
दरम्यान प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत देण्याची मागणी परिसरातील शेतकरी करीत आहेत. तसेच पुढील काही तास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.












