पुणे जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची घोषणा करण्यात आली असून या पदांवर चार सदस्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नव्या सभापतींचा कार्यकाळ फक्त सव्वा वर्षांचा असणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडीनुसार इंदापूर तालुक्यातील अंकिता पाटील-ठाकरे यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. तसेच हवेली तालुक्यातील जितेंद्र बडेकर यांना समाजकल्याण समितीचे सभापतीपद देण्यात आले आहे. वेल्हे तालुक्यातील अमोल नलावडे यांच्याकडे बांधकाम व आरोग्य समितीची जबाबदारी देण्यात आली आहे, तर मावळ तालुक्यातील दीपाली हुलावळे यांची कृषी समितीच्या सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापती निवडीचे सर्वाधिकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांना देण्यात आले होते. त्या अधिकारानुसार जिल्ह्यातील विविध तालुक्यांचा समतोल साधत या चार सदस्यांना संधी देण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. नवीन सभापतींना पद देतानाच त्यांच्या कार्यकाळाबाबतही स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या सभापतींचा कार्यकाळ सव्वा वर्षांचा असून तो २ जुलै २०२७ पर्यंत राहणार आहे.यापूर्वी पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी-माजी आमदारांनी उपमुख्यमंत्री सूनेत्रा पवार यांच्याकडे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सव्वा-सव्वा वर्षांचा ठेवण्याची मागणी केली होती.
त्यामुळे जिल्हा परिषद सभागृहाच्या पाच वर्षांच्या कालावधीत अधिकाधिक सदस्यांना पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे २४ जिल्हा परिषद सदस्यांना पदाधिकारी होण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले.












