अवकाळी पावसाने गुरुवारी शहरात कहर केला.घरात पाणी शिरणे, झाडपडी, रस्त्यांवर पाणी तुंबणे, सीमा भिंत कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. शहरात २६० ठिकाणी पाणी तुंबले तर ८२ ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली. यात सिंहगड रस्त्यावर झाड पडल्याने एक महिला मृत्यूमुखी पडली. विशेषतः शहराच्या दक्षिण आणि पश्चिम भागात अति मुसळधार पावसाने गुरुवारी दुपारी झोडपले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिकेच्या पावसाळापूर्व कामाच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत.
पुण्यातील प्रमुख रस्त्यासह काही भागाला नद्यांचे स्वरूप आले होते. अग्निशमन दल, पुणे पोलिस पालिका प्रशासनाने रस्त्यावर उतरून साचलेले पाणी काढण्यासोबतच रस्त्यावरून झाडे हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. अनेक भागात नागरिकांनीच स्वतःहून रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. दरम्यान, अनेक भागात वाहने पाण्यात अडकली गेली. वाहने मध्येच बंद पडल्याने वाहतूक कोंडी झाली.
तर दुसरीकडे काही रस्त्यांवर चार ते पाच फुट पाणी साचल्याने रस्ताच काही तास बंद ठेवण्याची वेळ आली. शहरातील केडवीनगर, सिंहगड रोड, बाणेर, बालाजीनगर, विश्रांतवाडी, स्वारगेट, कोथरूड, धायरी, वाकड, हडपसर, वारजे, डंकेवाडी या भागांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. कोंढवे धावडे भीमनगर येथील राधिका अपार्टमेंट (पार्किंग प्लस चार मजली) इमारतीच्या टेरेसवर बनवलेल्या फ्लॅटचे लोखंडी पत्रा व लोखंडी अँगलचे छत वाऱ्यामुळे उडून रस्त्यावर पडले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी हे शेड बाजूलाकरून वाहतुक सुरळीत केली.
प्रमुख रस्त्यांसह काही भागातील सोसायट्यांमध्ये देखील पाणी शिरले होते. वारजेतील सह्याद्री शाळा, रविवार पेठ, सैलसबरी पार्क, पाटील प्लाझा अशा ठिकाणी पाणी शिरल्याची माहिती अग्निशमन दलाकडे आली होती.
मुसळधार पावसात स्वारगेट तसेच वाकडेवारी बस स्थानकात पाणीच पाणी झाले होते, त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले होते, सध्या शाळांना सुट्या लागल्याने गावी जाणाऱ्या तसेच गावावरून पुण्यात येणाऱ्या प्रवाशाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अचानक झालेल्या या पावसाने प्रवाशांची तारांबळ उडाली स्थानकात चिखल झाला होता.
त्यातून वाट काढत प्रवासी कसेबसे बाहेर पडले, हडपसर भागातील सोलापूर रोड, फातिमानगर चौक रस्त्यावर पावसाचे जवळपास तीन ते चार फुट पाणी वाहत होते, साचलेल्या पाण्यात अनेकांची वाहाने बंद पडत होती. क्रोमा चौक, शेवकरवस्ती रेल्वेगेट जवळ, हडपसर इंडस्ट्रीयल, हडपसर गाव, जहागीर नगर, शिंदेवस्ती, मगरपट्टासिटी, वैदवाडी, रामटेकडी, वानवडी, बी. टी. कवडेरोड, ससाणेनगर आदी भागातील रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर पावसाचे पाणी साचलेले होते. शिंदेवस्तीत वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. अनेकांचे संसार उपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले.
पुणे, फुल विक्रीसाठी बसलेल्या एका महिलेच्या अंगावर मोठे झाड कोसळून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सिंहगड रोडवरील नवशा मारूती मंदिराजवळ घडली. एका बनविलेल्या टपरीत महिला फूल विक्रीसाठी चसलेली होती. रंजना नवनाथ गिरी (वय ६०, रा. दलवाडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
रंजना गिरी या दत्तवाडी येथील गणेश मळा परिसरात राहण्यास आहे. गुरूवारी हनुमान जयंती असल्याने त्या सकाळीपासूनच सिंहगड रोडवरील नवश्या मारूती मंदिराजवळ फुल विक्रीसाठी बसलेल्या होत्या. दरम्यान, दुपारी अचानक वादळी वा-यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्याचवेळी नवश्या मारूती मंदिराजवळ वडाचे भले मोठे झाड महिलेच्या टपरीवर कोसळले, यात महिला अडकली, गंभीर जखमी झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी तसेच पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
गुरुवारी दुपारी दोनव्या सुमारास जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही मिनिटांतच रस्त्याना नाल्याचे स्वरूप आले. पावसाळी गटारांच्या झाकणांवर कचरा अडकल्याने त्याचा निचरा होऊ शकला नाही, दरम्यान, अवकाळी पावसामुळे शहरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महापौर मंजुषा नागपूरे आणि आयुक्त नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
झाडपडीच्या ८२ घटना; ५२ ठिकाणी मदत
शहरात झाडपडीच्या तब्बल ८२ घटना घडल्या आहेत. वानवडी, पुणे विद्यापीठ, बाणेर, औध, सिंहगड रोड, ताडीवाला रोड, कोरेगांव पार्कसह जवळपास शहरातील २१ भागात झाडपडीच्या या घटना घडल्या आहेत. सायंकाळी सातपर्यंत प्रशासनाने यातील ५२ ठिकाणचे झाडे बाजूला काढली होती. तर उर्वरित ठिकाणी कार्य सुरू असल्याचे अग्निशमन दलाने सांगितले.
जिल्ह्यात दोन दिवस यलो अलर्ट
दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवसासाठी जिल्ह्याला येलो अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस दुपारनंतर, संध्याकाळनंतर आकाश ढगाळ राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.












