पिंपरी-चिंचवडमधील आळंदी परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत उलगडा करत आरोपीला अटक केली आहे. सहा वर्षीय धनश्री केदारी आणि ७० वर्षीय मंगल शिंदे यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसर हादरला होता.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विनायक भवारी (वय 31) याला आळेफाटा येथून ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी हा मृत चिमुकली धनश्रीचा नात्याने आजोबा असल्याचे समोर आले आहे. तपासात उघडकीस आलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री आरोपी घरात आला. घरातील व्यक्तींना परिचित असल्याने त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. त्यावेळी घरात धनश्री आणि मंगल शिंदे झोपल्या होत्या, तर संगीता केदारी या नाईट ड्युटीसाठी बाहेर गेल्या होत्या.
दरम्यान, मंगल शिंदे या संगीता केदारी यांना आरोपीविरुद्ध भडकवत असल्याचा संशय त्याच्या मनात निर्माण झाला होता. याच संशयातून संतापाच्या भरात आरोपीने प्रथम मंगल शिंदे यांचे डोके भिंतीवर आपटून हत्या केली.
त्यानंतर सहा वर्षीय निष्पाप धनश्रीचा उशीने तोंड दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.घटना घडल्यानंतर आरोपीने पळ काढत आळेफाटा येथे आश्रय घेतला. मात्र, गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने अचूक माहितीच्या आधारे सापळा रचत त्याला अटक केली.
या कारवाईत पोलिस निरीक्षक कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांच्या पथकाची महत्त्वाची भूमिका होती.दरम्यान, संगीता केदारी आणि आरोपी यांची दोन वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ओळख होऊन प्रेमविवाह झाला होता.
मात्र, काही काळापासून त्यांच्यात मतभेद निर्माण झाल्याने आरोपी वेगळा राहत होता. या पार्श्वभूमीवर संशयातूनच हा दुहेरी खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.या घटनेमुळे आळंदी परिसरात भीती आणि हळहळ व्यक्त केली जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.












