पुणे (प्रतिनिधी) : वेल्हा तालुक्यातील निगडे गाव हद्दीत घडलेल्या धक्कादायक लूटमारीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या १८ तासांत छडा लावून दोन आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तत्परतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
दिनांक ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ८:५० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हे निगडे (ता. वेल्हा, जि. पुणे) येथे सेंट्रींगच्या कामासाठी गेले असता, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून कोयत्याने मारहाण केली. त्यानंतर आरोपींनी जबरीने फिर्यादीकडील सुमारे ५ लाख ६७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली.
या प्रकरणी वेल्हा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३५१, ३५२, ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली समांतर तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी मुळशी परिसरात असल्याचे समजताच पोलिसांनी शिंदेवाडी (ता. मुळशी) येथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांची नावे प्रसाद सतीश शिंदे (वय २२, रा. शनिनगर, कात्रज) आणि अभिषेक सचिन खुटवड (वय २३, रा. संतोषनगर, कात्रज) अशी आहेत. दोघांना वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वेल्हा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी क्रमांक १ वर खून व जबरी चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी क्रमांक २ वर घरफोडीचे ६ व जबरी चोरीचा १ असे एकूण ७ गुन्हे आधीपासून नोंद आहेत.
ही उल्लेखनीय कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील कुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या नेतृत्वात पार पडली.या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, हवालदार अमोल शेडगे, मंगेश भगत, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अतुल डेरे, राजू मोमीन तसेच वेल्हा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, पोलीस कॉन्स्टेबल सोमेश राऊत व रोहित मरभळ यांनी मोलाची भूमिका बजावली.पुणे ग्रामीण पोलिसांच्या या जलद व प्रभावी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.












