पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील विविध भागांत नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या असून, नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. वृक्षारोपणाच्या देखभालीपासून ते सांडपाणी, अस्वच्छता, पाणीगळती आणि रस्त्यावरील सुरक्षिततेपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. प्रशासनाकडून तात्पुरत्या उपाययोजना केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वाकड व अन्य भागांत महापालिकेने रस्ते व पदपथांवर वृक्षारोपण केले असले तरी या वृक्षांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच संरक्षणासाठी ‘ट्री गार्ड’ न बसवल्याने अनेक रोपे वाळून जात आहेत. परिणामी, दरवर्षी नागरिकांच्या करातून होणारा खर्च वाया जात असून, शहरातील प्रदूषणातही वाढ होत आहे, अशी खंत दिलीप बाफना (वाकड) यांनी व्यक्त केली आहे.
पीसीएमटी चौकातील गव्हाणे वस्ती येथील करसंकलन कार्यालयासमोरील नाला दररोज तुडुंब भरून मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, वारंवार तक्रारी करूनही केवळ तात्पुरती कामे केली जात असल्याचा आरोप सुभाष केदारी यांनी केला आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत.आकुर्डी रेल्वे स्थानक ते गंगानगर रस्त्यावर पालिकेचे स्वच्छता कर्मचारी नियमित साफसफाई करत असले तरी परिसरातील काही हॉटेल्समुळे पुन्हा अस्वच्छता निर्माण होत आहे. हॉटेल मालकांवर कडक नियम लागू करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
चिंचवड परिसरात आदित्य बिर्ला हॉस्पिटलकडून नदीवरील पुलाजवळील पाणीपुरवठा पाइपलाइनमधून मोठ्या प्रमाणात गळती होत असून, पिण्याच्या पाण्याचा अपव्यय होत आहे. याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे राजेश डावरे यांनी नमूद केले आहे.
चिंचवड स्टेशन-लक्ष्मी कॉर्नर परिसरात तयार करण्यात आलेल्या नवीन पदपथ व सायकल ट्रॅकवर सर्रास दुचाकी पार्किंग आणि दुकानांचे फलक लावले जात असल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले आहे. प्रशासनाने यावर तातडीची कारवाई करावी, अशी मागणी उदय नवले यांनी केली आहे.
पिंपळे सौदागर येथील शिवार चौक ते जगताप डेअरीलगतच्या रस्त्यावर सांडपाण्याचे चेंबर गेल्या चार महिन्यांपासून फुटलेले असून, त्यामुळे अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक घसरून चेंबरमध्ये पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीही महापालिकेचे दुर्लक्ष सुरू असल्याची भावना संजय जाधव यांनी व्यक्त केली आहे.
वाकड येथील पोस्टल कॉलनीतील नाला अनेक दिवसांपासून स्वच्छ न केल्याने पाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. दुर्गंधी असह्य झाली असून, डेंगी व चिकनगुनियासारख्या आजारांचा फैलाव होत असल्याचे अशोक मोरवाल यांनी सांगितले आहे.एकूणच, पिंपरी-चिंचवड शहरात नागरी समस्यांचा विळखा घट्ट होत असून, महापालिकेने तातडीने ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.












