कृष्णा चौक, नवी सांगवी परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. भाजीपाला विक्रेते, पथारीवाले व हातगाडीधारकांनी रस्त्याच्या कडेला नव्हे, तर थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत व्यवसाय थाटल्याने वाहतूक व्यवस्थेचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. रस्ता आणि पदपथ दोन्ही अडवल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले असून अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे.
कृष्णा चौक हा परिसर आधीपासूनच वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत वर्दळीचा आहे. त्यातच अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली असून येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. अनेक वेळा रुग्णवाहिका, अग्निशमन दल व इतर अत्यावश्यक सेवा वाहने या कोंडीत अडकून पडत असल्याच्या घटना नागरिक सांगत आहेत. विशेषतः सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत अतिक्रमणांचे प्रमाण प्रचंड वाढते.
कामावरून घरी परतणारे नोकरदार, विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पदपथांवर जागा नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत असून दुचाकी व चारचाकी वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
चौकापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर साई चौक येथे अधिकृत भाजी मंडई उपलब्ध असतानाही अनेक फेरीवाले कृष्णा चौकातच व्यवसाय करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी तर होत आहेच, शिवाय अधिकृत मंडईतील विक्रेत्यांचेही आर्थिक नुकसान होत आहे.
याबाबत नागरिकांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. “अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. एखाद-दुसरी कारवाई झाल्याचे दाखवून पुन्हा परिस्थिती जैसे थे होणे, ही नित्याची बाब बनली असल्याचा आरोपही केला जात आहे.
नागरिकांच्या अपेक्षा
अतिक्रमणे तातडीने हटवून वाहतूक सुरळीत करावी
पदपथ पूर्णपणे मोकळे करावेत
फेरीवाले व पथारीवाल्यांना साई चौक येथील अधिकृत भाजी मंडईत स्थलांतरित करावे
सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत रस्ता मोकळा ठेवण्यासाठी नियोजन करावे
दरम्यान, साई चौक येथील लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप भाजी मार्केटचे अध्यक्ष संजय मराठे यांनीही अनधिकृत भाजी विक्रेत्यांमुळे अधिकृत विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे सांगून महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
या संदर्भात सहाय्यक आयुक्त अतुल पाटील (अतिक्रमण निर्मूलन विभाग) यांनी, “नवी सांगवीतील कृष्णा चौक परिसरातील अतिक्रमणांची माहिती घेऊन क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तत्काळ कारवाईच्या सूचना दिल्या जातील,” असे सांगितले आहे.आता प्रशासन प्रत्यक्षात कधी आणि कितपत ठोस पावले उचलते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.












