एरवी साध्या खड्ड्यांसाठीही महिनोन्महिने पाठपुरावा करायला लावणाऱ्या पुणे महानगरपालिकेने एका रात्रीत रस्ता ‘गुळगुळीत’ केल्याचा पराक्रम केला आहे. मात्र, या घाईगडबडीच्या डांबरीकरणामुळे प्रशासनाच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांना न हटवता तसेच ड्रेनेज चेंबर योग्य पातळीवर न आणताच त्यावर थेट डांबराचा थर टाकण्यात आल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, टाकण्यात आलेला डांबरी थर अत्यंत पातळ व निकृष्ट असून तो हातानेही सहज उखडता येईल इतका कमकुवत आहे.
कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहने हटवण्याची तसदी न घेता, चक्क वाहनांच्या भोवतीच डांबरीकरण उरकले. परिणामी, वाहनं हटवल्यानंतर त्या जागी जुनाच रस्ता तसाच दिसून येत आहे.याशिवाय, काही ठिकाणी ड्रेनेजची चेंबर डांबराखाली गाडली गेली असून काही ठिकाणी ती सखल राहिली आहे.
यामुळे भविष्यात पावसाळ्यात पाणी साचून रस्ता लवकर खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप असून, “एवढ्या घाईत आणि निकृष्ट पद्धतीने डांबरीकरण करण्यामागे प्रशासनाचा नेमका उद्देश काय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.












