पिंपळे सौदागर परिसरातील साई ऑर्चिड सोसायटीसमोरील बीआरटी मार्गालगतचा पदपथ मोठ्या प्रमाणात खचल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पदपथालगत असलेले गटाराचे झाकणही खचल्यामुळे या ठिकाणी अत्यंत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे.
पदपथ अचानक खचल्याने येथे मोठा खड्डा तयार झाला असून, त्या ठिकाणी कोणतेही सुरक्षात्मक फलक, बॅरिकेड्स किंवा इशारा देणारी व्यवस्था नसल्याचे दिसून येते. त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी परिसरात अपुरा प्रकाश असल्याने एखाद्या पादचाऱ्याचा पाय खचलेल्या भागात गेल्यास गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा मार्ग वर्दळीचा असून सकाळ-संध्याकाळी मोठ्या संख्येने पादचारी, शाळकरी मुले व ज्येष्ठ नागरिक या रस्त्याचा वापर करतात. खचलेल्या पदपथामुळे दुचाकीस्वारांनाही अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. मात्र, अद्याप प्रशासनाकडून तातडीची कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणी महापालिका प्रशासनाने तातडीने पाहणी करून खचलेला पदपथ व गटाराच्या झाकणाची दुरुस्ती करावी, तोपर्यंत आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था, बॅरिकेड्स व इशारा फलक उभारावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
याबाबत दळणवळण विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे यांनी सांगितले की, “या ठिकाणची तातडीने पाहणी करण्यात येईल. खचलेले गटार व पदपथामुळे निर्माण झालेला धोका लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेसाठी लगेचच आवश्यक दुरुस्तीची कामे हाती घेतली जातील.”
स्थानिक नागरिक चंदन चौरसिया म्हणाले, “खचलेले गटाराचे झाकण व पदपथामुळे दररोज ये-जा करताना अपघाताची भीती वाटते. प्रशासनाने तातडीने पाहणी करून योग्य उपाययोजना कराव्यात. लवकरात लवकर दुरुस्ती झाली तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून त्वरित कारवाई होणार की नाही, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.












