पुणे (प्रतिनिधी): जी. एच. रायसोनी काॅलेज आॅफ इंजीनिअरिंग आणि मॅनेजमेंट तसेच जी. एच. रायसोनी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, वाघोली येथे भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (बार्टी), पुणे चे प्रमुख डॉ. बबन जोगदंड उपस्थित होते, तर माजी सनदी अधिकारी सदानंद कोचे यांनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. एन. बी. हुल्ले, अधिष्ठाता डॉ. एन. यू. कोरडे, डॉ. एच. आर. कुलकर्णी, डॉ. सुरेंद्र वाघमारे तसेच डॉ. प्रेमेंद्र बनसोड यांची उपस्थिती लाभली.जयंतीनिमित्त आयोजित उपक्रमांमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि १८ तास सलग अभ्यास अशा उपक्रमांचा समावेश होता.
निबंध स्पर्धेत ३२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून त्यापैकी ६ विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच वक्तृत्व स्पर्धा आणि सलग अभ्यास उपक्रमात सुमारे ६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत १८ तास सलग अभ्यास करण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला, ज्यातून विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती असलेली निष्ठा अधोरेखित झाली.
दरम्यान उपस्थितांना संविधानाच्या प्रस्तावनेची शपथ देण्यात आली. या प्रसंगी डॉ. बबन जोगदंड यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करत, “शिक्षण हेच खरे शस्त्र असून सामाजिक परिवर्तनासाठी ते अत्यावश्यक आहे,” असे सांगितले. विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या विचारांचा अंगीकार करून समाजघडणीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी सनदी अधिकारी सदानंद कोचे यांनीही बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली.सर्व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचे स्मरण करून विद्यार्थ्यांना त्यांच्या आदर्शांचे अनुसरण करण्याचे महत्त्व पटवून दिले.
विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषणे सादर करून कार्यक्रमाला अधिक रंगत आणली.या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, बौद्धिक विकास आणि शैक्षणिक प्रेरणा वाढीस लागली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यास निश्चितच हातभार लागला आहे.












