महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) सुरक्षित प्रवासाच्या दाव्याला कोल्हापूर-पुणे ई-शिवाई बसमधील एका संतापजनक घटनेने तडा गेला आहे. बस चालकाच्या बेजबाबदार आणि उद्धट वर्तनामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आलाच, पण जाब विचारणाऱ्या एका दाम्पत्याला भर मध्यरात्री कराडजवळ महामार्गावर उतरवण्याचा धक्कादायक प्रकार संबंधित चालकाने केला.
या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि चालकांच्या वर्तणुकीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेली ही ई-शिवाई बस प्रवासाच्या सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली. बसमधील चालक अत्यंत धोकादायक पद्धतीने वाहन चालवत होता.
वारंवार जोरात ब्रेक लावणे, बस वेडीवाकडी वळवणे आणि विनाकारण सतत हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करणे, अशा कृत्यांमुळे प्रवासी भयभीत झाले होते. जेव्हा काही प्रवाशांनी चालकाला बस व्यवस्थित चालवण्याची विनंती केली, तेव्हा त्याने चक्क प्रवाशांशीच हुज्जत घालण्यास आणि अश्लील भाषेत बोलण्यास सुरुवात केली.
भर महामार्गावर दाम्पत्याला उतरवलेवाद इतका विकोपाला गेला की, कराडजवळील टोलनाक्याच्या काही अंतरापूर्वी चालकाने अचानक बस थांबवली. जाब विचारणाऱ्या फाळके नामक प्रवाशाला आणि त्यांच्या पत्नीला चालकाने सक्तीने बसमधून खाली उतरवले. निर्जन ठिकाणी आणि मध्यरात्रीच्या वेळी एका दाम्पत्याला अशा प्रकारे रस्त्यावर सोडण्याच्या प्रकारामुळे इतर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
चालकाची ही दादागिरी पाहून बसमधील इतर प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि त्या दाम्पत्याला पुन्हा बसमध्ये घेईपर्यंत बस पुढे नेण्यास विरोध केला. प्रवाशांच्या प्रचंड दबावामुळे अखेर चालकाला माघार घ्यावी लागली आणि त्याने त्या दाम्पत्याला पुन्हा बसमध्ये घेतले.प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासनया गंभीर प्रकरणाची दखल आता एसटी प्रशासनाने घेतली आहे.
“चालकाच्या या वागणुकीबाबत तक्रार प्राप्त झाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. दोषी चालकावर कडक कारवाई केली जाईल,” असे नियंत्रक अरुण सिया यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, हायवेवर प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा चालकांवर केवळ चौकशीचे सोपस्कार न होता ठोस कारवाई व्हावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.












