वाई ,दिनांक१७ एप्रिल २०२६: महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वतीने, महर्षी अण्णा कर्वे यांच्या जयंतीनिमित्त वाई प्रकल्प आणि माऊली ब्लड सेंटर, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. “ज्ञानाचा प्रकाश, मानवतेचा सुवास – रक्तदानातून जपूया नव्या जीवनाचा श्वास!” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात आला.
सत्यवती जोशी सभागृह, कन्या शाळा, वाई येथे शुक्रवार दि. १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:००ते दुपारी २.३० या वेळेत आयोजित या शिबिरास नागरिक, पालक व युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वाई नगराध्यक्ष मा. श्री. अनिल सावंत उपस्थित होते. तसेच वाई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. श्री. अमोल गवळी यांचीही विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाई प्रकल्पाच्या अध्यक्षा मा. उमाताई जोशी या होत्या.माऊली ब्लड सेंटर, सातारा चे अध्यक्ष मा. श्री. गिरीश पेंढारकर, मा.कुबेर सर ,माऊली ब्लड सेंटर सातारा चे वैद्यकिय अधिकारी मा.डॉ. रमणलाल भट्टड ,वाई अर्बन बँकेचे संचालक मा. मकरंद मुळे ,नगरसेविका मा. केतकी पाटणे इ. मान्यवर उपस्थित होते. वाई प्रकल्प शाला समिती सदस्य मा.अंजली काणे ,मा. डाॅ.स्वाती देशपांडे, मा. सुधा जाधव ,मा. मनिषा घैसास,मा. रमेश कोरडे, मा. सुनील शिंदे, मा.श्रीराम भट ,मा. मिलिंद पुरोहित त्याचप्रमाणे प्रशालेच्या मुख्याध्यापिका मा. विद्या राव व वाई प्रकल्पातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक या सर्व मान्यवरांची उपस्थितीही उल्लेखनीय ठरली.
माऊली ब्लड सेंटरच्या कुशल व तज्ज्ञ वैद्यकीय पथकाने संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुरक्षित, शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पाडत, प्रत्येक रक्तदात्याची विशेष काळजी घेतली. या सेवेतील प्रत्येक क्षणात संवेदनशीलता आणि कर्तव्यभावना यांचा सुंदर संगम दिसून आला.रक्तदान करून जीवनदान देणाऱ्या प्रत्येक दात्याचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या शिबिरात तब्बल १०० रक्तदात्यांनी सहभाग घेत, अनेक गरजू रुग्णांच्या जीवनात आशेचा किरण प्रज्वलित केला. या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार व महान कार्यास मनःपूर्वक वंदन!
या उपक्रमामुळे समाजात रक्तदानाबाबत जागृती निर्माण होऊन मानवतेचा संदेश अधिक दृढ झाला. आयोजकांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.











