महिला आरक्षण विधेयकावरून केंद्र सरकार आणि विरोधकांमध्ये रणकंदन सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सरड्याची उपमा देत रंग बदलल्याचा आरोप केला होता.
तसेच, माझ्या स्तरावरील नेत्याने महिला आरक्षण विधेयकावर खुली चर्चा करावी, असे आव्हान फडणवीसांनी विरोधकांना दिलं होतं.विरोधकांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाची भ्रुणहत्या केली, अशी टीकाही फडणवीसांनी केली होती.
याला आता शिवसेना ( ठाकरे गट ) नेत्या, सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी सुषमा अंधारेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटोही दाखवले आहेत. त्या पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “भ्रुणहत्या हा शब्द वापरताना भाजपच्या लोकांना काही वाटत नसेल. भ्रुणहत्या हा शब्द पोटात कालवा कालव करणार आहे. ज्यांनी गोध्रा प्रकरणात लहान मुलाला खडकावर आपटून मारलं आणि ज्यांनी त्याचे रिपोर्टिंग केले, त्यांना भ्रुणहत्या शब्दाचा अर्थ कळेल.”
“देवेंद्र फडणवीस म्हणालेले, ‘दक्षिणेतील खासदारांनी संख्या ५० टक्क्यांनी वाढणार असून ते २३.७६ टक्क्यांवरून २३.८७ टक्के होतील.’ मग, ५० टक्के खासदार वाढत असतील तर ४७ टक्के होतील. आता २३.८७ हा आकडा फडणवीसांनी कुठून आणला आहे?” असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे.
केरळची लोकसंख्या वाढली नाही. उलट उत्तर प्रदेशाची लोकसंख्या वाढली आहे. मग, खासदारांचा आकडा कसा काय वाढणार आहे? मग कुणाचे जास्त खासदार जाऊ शकतील? उत्तर विरुद्ध दक्षिण हा संघर्ष भाजप उभा करत आहे,” असा आरोप अंधारेंनी केला आहे.
“भाजपला वाटतंय की, महिला आरक्षण द्यायचे आहे, तर ५४३ मधील आरक्षण द्यावे. आम्ही तयार आहोत. तरीही फडणवीसांनी म्हटलं, ‘विरोधक रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे आहेत.’ मला याचे वाईट वाटलं. मुख्यमंत्र्यांकडून अशा भाषेची अपेक्षा नाही. मी असले कुठलेही शब्द वापरणार नाही.
पण, काही फोटो आपल्याला दाखवले पाहिजेत,” असे म्हणत अंधारेंनी पंतप्रधान मोदी यांनी विविध पोषाख घातलेले फोटो दाखवले आहेत.”देवेंद्र फडणवीस हे विरोधकांना रंग बदलणारे सरडे बोलणार, भ्रुणहत्या शब्द वापरणार… असे शब्द लोकप्रतिनिधींच्या तोंडी शोभत नाहीत. माझ्यावर सुसंस्कृत वारसा आहे.
माझ्या आई-वडिलांचे माझ्या नेतृत्त्वाचे माझ्यावर चांगले संस्कार आहेत. त्यामुळे मी कुठलेही वाईट शब्द वापरणार नाही,” असा टोला अंधारेंनी लगावला आहे.”मी अनुसूचित जाती आणि जमातीतून येत नाही. पण, ज्या समुहातून येते, माझ्या समुहातील संसद सोडा, विधामंडळ आणि ग्रामपंचयातमधी सुद्धा नाही.
मला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहात?” असा सवाल अंधारेंनी फडणवीसांना विचारला आहे.”फडणवीस साहेब तुमचा स्तर कोणता एकदा मला सांगा. तुम्ही तुमचा स्तर कसा ठरवत आहात? वर्णव्यवस्थेच्या आधारे तुम्ही श्रेष्ठ आणि कनिष्ठ असल्याचे ठरवताय का?” असा प्रश्नही फडणवीसांना अंधारेंनी दिलेल्या आव्हांनावरून विचारला आहे.












