वाई प्रतिनिधी
राजे फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) ही सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रभर सातत्याने कार्यरत आहे. कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवविचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे हे संस्थेचे प्रमुख धोरण आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या काळात राजे फाऊंडेशनच्या शिलेदारांनी थेट घटनास्थळी जाऊन मदतकार्य केले होते. मिठापासून ते ताटापर्यंत मदत करत संस्थेच्या वतीने सुमारे २००० किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. मराठवाड्यातील तब्बल २० गावांना सढळ हस्ते मदत करून संस्थेने सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवले होते.

दरम्यान, सध्या कडाक्याच्या थंडीचे औचित्य साधून राजे फाऊंडेशनच्या वतीने मुंबईतील नामांकित कस्तुरबा रुग्णालय येथे रुग्णांसाठी “मायेची ऊब” हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत रुग्णांना थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व रुग्णांना बिस्किटांचे पुडे, विविध फळे व ज्यूसचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात कस्तुरबा रुग्णालयातील जवळपास ३०० रुग्णांना सढळ हस्ते साहित्य वाटप करण्यात आले.

राजे फाऊंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी एकत्र येत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. या उपक्रमासाठी राजे फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. सिद्धांत पिसाळ, सचिव श्री. रोहित पिसाळ, उपखजिनदार ऋषिकेश आचारी, सोशल मीडिया प्रमुख प्रदीप कस्तुरे व मयुरेश पाटील यांच्यासह प्रशांत गुप्ता, सूर्यकांत रेडेकर, योगेश कांबळे, राहुल माने आदी सदस्य उपस्थित होते. याशिवाय कस्तुरबा रुग्णालयाचे प्रशासन, डीन तसेच परिचारिका वर्गानेही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. राजे फाऊंडेशनच्या या सामाजिक उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर समाधान व दिलासा दिसून आला असून, संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.












