“मेट्रो काम आणि जीप वाहतूकमुळे रस्ता गोंधळात, नागरिकांचे हाल!”
कात्रज, ता. ३१ : कात्रज चौक म्हणजे आता पुण्याचं प्रवेशद्वार नाही, तर वाहतूक कोंडीचं जिवंत उदाहरण बनलं आहे. अवैध प्रवासी वाहतूक, रिक्षाचालकांची मनमानी, पीएमपी बसांची गोंधळलेली दिशा आणि मेट्रोच्या अर्धवट कामामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
सकाळ असो वा संध्याकाळ कात्रज चौक ओलांडणं म्हणजे संयमाची परीक्षा ! खासगी प्रवासी वाहतूक बिनधास्त सुरू आहे, रिक्षा रस्त्यात उभ्या, वाहतूक नियम कागदापुरतेच उरलेत. यावर नियंत्रण ठेवायचं काम नेमकं कोणाचं, हा प्रश्न आता पुणेकर थेट विचारू लागले आहेत.
मेट्रोचं काम सुरू आहे, हे मान्य ! पण नियोजन कुठे आहे ? उड्डाणपुलाचं काम संथ गतीने सुरू असताना नागरिकांनी किती दिवस ‘लवकरच काम पूर्ण होईल’ या आशेवर जगायचं ? वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकल्याच्या घटना म्हणजे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच मोठं प्रश्नचिन्ह आहे.
आज कात्रज चौकात ‘बॉटलनेक’ नव्हे, तर ‘ब्रेकडाउन’ची स्थिती आहे. तक्रारींचे अर्ज वाढतायत, पण कारवाईचा वेग मात्र रेंगाळलेला. पोलिस, महापालिका, पीएमपी आणि मेट्रो प्रशासन हे सगळे आपापल्या सोयीने काम करतात, आणि चौकात मात्र रिक्षा आणि वडाप वाल्यांचा गोंधळच गोंधळ !
वाहतूक सुरळीत करायची असेल, तर अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर हातोडा, रस्त्यावर थांबणाऱ्या रिक्षांवर तात्काळ कारवाई, पीएमपीसाठी स्वतंत्र लेन आणि मेट्रो कामाजवळ प्रभावी ट्रॅफिक मॅनेजमेंट हे सगळं आता “पर्याय” नाही, तर “गरज” बनली आहे.
कात्रज चौक सुधारण्यासाठी प्रशासन जागं होणार की नागरिकांचा संयम संपेपर्यंत वाट पाहणार ?
हा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.











