पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ अंतर्गत प्रभाग क्रमांक ३८ मध्ये झालेल्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत ई.व्ही.एम. मतांमध्ये तब्बल १,०११ मतांचा फरक आढळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रभाग ३८(अ) ओबीसी महिला गटाच्या वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रा. दिपाली दिलीप सूर्यवंशी जेठे यांच्या वतीने प्रतिनिधी प्रा. आनंद जेठे तसेच भारतीय मानवतावादी पार्टीचे नाशिक जिल्हाध्यक्ष शरद धनराव यांनी संयुक्तपणे राज्य निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी पत्रात प्रभाग क्रमांक ३८ मध्ये एकूण ७९,८२६ मतदारांनी मतदान केल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, १६ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या मतमोजणीनंतर पुन्हा देण्यात आलेल्या अधिकृत पत्रात ई.व्ही.एम. मशीनमध्ये केवळ ७८,७१९ मते नोंद झाल्याचे दर्शविण्यात आले. या दोन्ही अधिकृत आकडेवारीत १,०११ मतांचा फरक स्पष्टपणे दिसून येत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
मतमोजणी प्रक्रियेदरम्यान भारतीय मानवतावादी पार्टीचे शरद धनराव हे उमेदवार प्रा. दिपाली जेठे यांचे अधिकृत मतमोजणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. तसेच प्रा. आनंद जेठे यांनी मतमोजणीदरम्यान या मतफरकाबाबत तत्काळ आक्षेप नोंदविला होता. मात्र, या आक्षेपाची दखल न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारदारांच्या मते, या संपूर्ण प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, ई.व्ही.एम. प्रणालीच्या विश्वासार्हतेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेवरील नागरिकांचा विश्वास डळमळीत होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.या संयुक्त तक्रारीद्वारे राज्य निवडणूक आयोगाकडे पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये भविष्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, प्रभाग ३८ मधील ई.व्ही.एम. मतफरकाबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच या प्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने लेखी खुलासा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे प्रभाग ३८ मधील निवडणूक निकालावर आणि एकूणच ई.व्ही.एम. वापराबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोग या प्रकरणावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












