आंबेगाव परिसरातील नामांकित वेद फूड – चितळे बंधु दुकानात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत आंबेगाव पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने रेकॉर्डवरील गुन्हेगारास अटक करून तब्बल तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी रात्री १०.१५ ते २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.४५ या कालावधीत विंडसर काऊंटी सोसायटी, दत्तनगर, नन्हे रोड, आंबेगाव, पुणे येथील वेद फूड – चितळे बंधु दुकानाचे गाळा क्रमांक १४ व १५ चे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून चोरी केली होती. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(४), ३३१(३), ३२४(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला. तपासादरम्यान आरोपी १) ओमकार मारुती देडे (वय २१, व्यवसाय – साफसफाई, रा. गणपती मंदिरासमोर, किरकटवाडी, धायरी, पुणे) आणि २) विधीसंघर्षीत बालक यांना पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर व त्यांच्या पथकाने सापळा रचून अटक केली.
तपासात सदर आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले असून, त्यांच्या अटकेमुळे पुढील तीन गुन्हे उघडकीस आले आहेत.
आंबेगाव पोलीस ठाणे गु.रजि. क्र. ३१/२०२६ – बी.एन.एस. २०२३ कलम ३०५(अ), ३३१(४), ३३१(३), ३२४(२)
आंबेगाव पोलीस स्टेशन गु.रजि. क्र. ३४/२०२६ – बी.एन.एस. कलम ३०२(२)
विमानतळ पोलीस स्टेशन गु.रजि. क्र. ३८५/२०२३ – भारतीय दंड संहिता कलम ३७९
आरोपींकडून एकूण १,२४,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्यामध्ये ऑटो रिक्षा, मोटारसायकल आणि रोख रक्कम यांचा समावेश आहे, जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी सध्या पोलीस कस्टडीत असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर करत आहेत.
ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, मा. सह आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त श्री. राजेश बनसोडे, मा. पोलीस उपआयुक्त श्री. मिलिंद मोहिते आणि मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
या यशस्वी मोहिमेत पोलीस निरीक्षक (गुन्हे) गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर तसेच शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हणमंत मासाळ, निलेश जमदाडे, प्रमोद भोसले, सुभाष मोरे, योगेश जगदाळे, हरिश गायकवाड, राकेश टेकवडे व शिवाजी पोटोळे यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.
आंबेगाव पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.












