स्वारगेट एसटी डेपो अंतर्गत असलेल्या शिवशाही बस क्रमांक MH06 BW 0448 संदर्भात अत्यंत गंभीर, धक्कादायक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला थेट धोका निर्माण करणारा प्रकार उघडकीस आला आहे. एसटी महामंडळाच्या स्पष्ट तांत्रिक नियमांचे उल्लंघन करत, पूर्णपणे क्रॅक झालेल्या चासीवर वेल्डिंग करून तब्बल १९ दिवस ही बस प्रवासी सेवेत चालवण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
8 जानेवारीला बेकायदेशीर वेल्डिंग
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 8 जानेवारी 2026 रोजी सदर शिवशाही बसच्या चासीला मोठे क्रॅक आढळून आले होते. एसटी महामंडळाच्या नियमानुसार, अशा स्थितीतील बस तात्काळ सेवेतून बाद करून स्क्रॅप करणे बंधनकारक आहे.
मात्र, हे नियम धाब्यावर बसवत स्वारगेट डेपोतील अनुभवी वेल्डरांनी सुरक्षेच्या कारणास्तव वेल्डिंग करण्यास नकार दिल्यानंतरही, बाहेरून खासगी वेल्डर बोलावून बेकायदेशीरपणे चासी वेल्डिंग करण्यात आली.
डेपोतील वेल्डरांनी चासी क्रॅक झाल्यावर वेल्डिंग करणे अत्यंत धोकादायक असून, भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याचा स्पष्ट इशाराही दिला होता. तरीदेखील तो पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आला.
27 जानेवारीपर्यंत थेट प्रवासी सेवेत
अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, दि. 8 जानेवारी ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत ही शिवशाही बस थेट प्रवासी सेवेत रस्त्यावर धावत होती.
या काळात शेकडो प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला, मात्र त्यांच्या जीवाला किती मोठा धोका होता, याची कोणालाही कल्पना नव्हती.
तांत्रिकदृष्ट्या अयोग्य आणि अपघातास कारणीभूत ठरू शकणारी बस सेवा चालू ठेवणे म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
आता त्याच चासीवर नवी बॉडी बसवण्याचा प्रयत्न
या प्रकरणातील सर्वात गंभीर आणि धक्कादायक बाब म्हणजे, तीच क्रॅक झालेली चासी सध्या दापोडी (Dapodi) येथे नवीन बॉडी बांधण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मूलभूत संरचनात्मक दोष असलेल्या चासीवर नवीन बॉडी बसवणे म्हणजे भविष्यातील मोठ्या अपघाताचे आमंत्रण असल्याचे तज्ज्ञांचे स्पष्ट मत आहे.
कोणाच्या आदेशाने हे सर्व घडले?
या संपूर्ण प्रकरणामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत —
बस MH06 BW 0448 च्या चासीवर वेल्डिंग करण्याचे आदेश कोणी दिले?
बाहेरून खासगी वेल्डर बोलावण्यास परवानगी कोणी दिली?
वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती होती का?नियम मोडून १९ दिवस प्रवासी सेवा सुरू ठेवण्यामागे कोणाचा दबाव होता?
चासी क्रॅक असतानाही स्क्रॅप का करण्यात आली नाही?
सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी
प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्या या गंभीर प्रकरणाची स्वतंत्र, तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, प्रवासी आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.जर या कालावधीत एखादा अपघात घडला असता, तर त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित डेपो व्यवस्थापन व वरिष्ठ अधिकाऱ्यांवर निश्चित करावी, अशीही मागणी होत आहे.













1 thought on “स्वारगेट एसटी डेपोतील MH06 BW 0448 बस प्रकरणाला धक्कादायक वळण”
Most of these Shivshahi buses are dirty and damaged with frequent breakdowns. It’s a blot on MSRTC to keep this fleet risking passenger lives. They should dispense with this fleet immediately.