दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मुंढवा जमीन घोटाळ्यात निर्दोष असल्याचं खारगे समितीनं म्हटलं असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व शक्यता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी फेटाळून लावत पार्थ पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.या आरोपांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या विरोधात आता थेट अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या, अंजली दमानिया यांची आजची विधन ऐकल्यानंतर समाजात किती खालच्या पातळीची विकृती असू शकते हे पाहायला मिळत आहे. अंजली दमानिया यांना कपोल-कल्पित गोष्टी सांगण्याची सवय आहे. आणि त्याद्वारे त्या एखाद्या व्यक्तीची आणि कुटुंबाची सतत बदनामी करत असतात.
यापूर्वी देखील दमानिया यांनी अजितदादांवर खूप सारे आरोप केले. मात्र त्यातील एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत.आता अंजली दमानिया या अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर टीका करत आहेत. त्या कुटुंबाने आपला घरातला व्यक्ती गमावला आहे आणि सबंध महाराष्ट्र त्याबाबत हळहळ व्यक्त करत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मुलावरतीच वडिलांच्या घातपाताचा आरोप अंजली दमानिया करत आहेत.
हे नीच पातळीचे आणि किळसवाण विधान आहे.खरगे समितीचा अहवाल येण्यापूर्वीची काही विधाने आणि विमान अपघाताबाबतचा तपास सुरू असताना केली जाणारी विधाने त्या कोणताही पुरावा न देता करत आहेत. अशी विधानं करून सातत्याने चर्चेत राहण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. मात्र हा अत्यंत घाणेरडा प्रकार आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंजली दमानिया यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं रूपाली चाकणकर यांनी सांगितला आहे.












