वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे झालेल्या भव्य चित्ररथ स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या टीमने देशात प्रथम क्रमांक पटकावून राज्याचा मान उंचावला. या यशस्वी टीममध्ये वाई शहराची रणरागिणी अमरीन इनामदार हिचा अत्यंत मोलाचा वाटा असून तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे वाई शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
दिल्लीतील कर्तव्यपथावर सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथाने राज्याची सांस्कृतिक परंपरा, इतिहास आणि आधुनिक प्रगती यांचे आकर्षक दर्शन घडवले. या चित्ररथाच्या सादरीकरणात अमरीन इनामदार हिने घेतलेली मेहनत, सादरीकरणातील आत्मविश्वास आणि समर्पण भाव यामुळेच महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांक मिळवता आला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
या अभिमानास्पद कामगिरीबद्दल गुरुवारी वाई शहरात अमरीन इनामदार हिचा भव्य सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा भारत सरकारचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते अमरीनचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री आठवले यांनी अमरीनच्या जिद्दीचे आणि कर्तृत्वाचे कौतुक करत, “वाईसारख्या शहरातील मुलीने राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. अशा तरुणींमुळे देशाची आणि राज्याची ओळख अधिक भक्कम होते,” असे गौरवोद्गार काढले. तसेच तिच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड, बाजीगर भाई इनामदार, नूतन वाई पंचायत समिती सदस्य स्वप्नील गायकवाड यांच्यासह विविध मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अमरीन इनामदार हिच्या यशाचे कौतुक करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
वाई शहरातील एका तरुणीने राष्ट्रीय पातळीवर झेंडा रोवल्यामुळे संपूर्ण शहरात आनंदाचे वातावरण असून, अमरीन इनामदार ही आज वाईच्या तरुणाईसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या या यशामुळे वाई शहराचे नाव देशपातळीवर उजळले असून, भविष्यातही ती अशाच प्रकारे यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.











