महापालिका भवन) परिसरात दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील सुमारे ६० हजार रुपयांचा मोबाईल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी Shivajinagar Police Station येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण (वय ३४) हा धायरी येथील स्वरा हाइट्स येथे राहणारा आहे. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो महापालिका भवन परिसरात उभा राहून धायरीकडे जाण्यासाठी मोबाईल ॲपद्वारे वाहन बुक करीत होता. त्यावेळी तो रस्त्याच्या कडेला मोबाईल हातात धरून उभा असताना दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण वेगाने तेथे आले.
क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्याच्या हातातील महागडा मोबाईल फोन हिसकावून घेतला आणि भरधाव वेगाने पसार झाले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे तरुण घाबरून गेला. घटनेनंतर त्याने तात्काळ पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.
पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके कामाला लागली आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस अंमलदार अशोक धावडे करीत आहेत.
दरम्यान, रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी उभे राहून मोबाईल वापरताना विशेष दक्षता घ्यावी, वाहन बुक करताना आजूबाजूची परिस्थिती तपासावी आणि संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. शहरात वाढत्या मोबाईल स्नॅचिंगच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.












