महाशिवरात्र उत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील पाताळ लिंग, शिखरलिंग व स्वयंभूलिंगाच्या अशा त्रिलोकाधिपतीच्या दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. वर्षातून एकदाच महाशिवरात्रीला गुप्तलिंगाच्या दर्शनाची संधी भाविकांना मिळते.
आज पहाटे तीन वाजता गुप्तलिंग व शिखरलिंग उघडण्यात आले. साफसफाई करून मानाची पुजा करण्यात आली. त्यानंतर पहाटेपासून दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावून दर्शन घेतले. शिखरलिंगाच्या दर्शनासाठी सज्यावरून शिखरात जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला होता. तर गाभाऱ्यातील स्वयंभूलिंगाच्या उत्तरेला असणाऱ्या गुप्तलिंगाचे दर्शन भाविक खाली उतरून घेत होते.
गडावर उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. गाभाऱ्यात व मंदिरासमोर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यावर त्रिलोकाधिपती असा उल्लेख करण्यात आला होता. दवणा, पानफूल व भंडारा भाविक लिंगावर अर्पण करत होते. खंडोबाचा जयघोषही सुरु होता.
मार्तंड देवसंस्थानच्या वतीने दर्शनरांग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त घोणे यांनी सांगितले. दर्शन सुरळीत होण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उद्या सोमवारी स्थानिक ग्रामस्थांसाठी गुप्तलिंग व शिखर लिंग खुले असणार आहे. सोमवारी रात्री पुजा करून हे मंदिर बंद करण्यात येणार आहे.












