आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी उपयोगात आलेल्या, आरामदायी प्रवास घडवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग (एसटी) महामंडळाच्या एशियाड (हिरकणी) बसची संख्या आता कमी होत आहे.तर, ताफ्यात नुकत्याच आलेल्या नव्या ‘लालपरी’ आणि जुन्या ‘हिरकणी’ बसमध्ये रंगसंगती वगळता फारसा फरक राहिलेला नाही. पण, सुविधा समान असताना एकाच मार्गावर भाडे वेगळे का? असा प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत.
दिल्ली येथे १९८२ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना ने-आण करण्यासाठी एसटीने स्वतःच्या दापोडी आणि छत्रपती संभाजीनगर येथील कार्यशाळेत २०० आराम बसची निर्मिती केली होती. स्पर्धा संपल्यानंतर महामंडळाने ५० बस खरेदी करत प्रवासी सेवा सुरू केली. ‘एशियन गेम्स’ या वरून ‘एशियाड’ हे नाव या बसला देत दादर-पुणे मार्गावर या बस धावल्या.
आरामदायी, जलद प्रवास, विशिष्ट संरचना आणि वेगळी रंगसंगती यामुळे अल्पावधीच या बस प्रवाशांच्या पसंतीस उतरल्या. प्रतिसाद वाढल्याने राज्यात इतर मार्गांवरही ‘एशियाड’ धावू लागली. निमआराम सेवा असल्यामुळे या बसचे तिकीटही साध्या बसपेक्षा अधिक आणि ‘शिवशाही’, ‘शिवनेरी’ बसपेक्षा कमी ठेवण्यात आले.
दरम्यान आठ मार्च २०१३ रोजी महिला दिनाचे औचित्य साधून ‘एशियाड’ बसचे ‘हिरकणी’ असे नामकरण करण्यात आले. हिरव्या-पांढऱ्या रंगाऐवजी गुलाबी-पांढरा अशी रंगसंगती ठेवण्यात आली. आता पुन्हा ‘शिवशाही’चे ‘हिरकणी’मध्ये रुपांतर होणाऱ्या बसचा रंग पूर्वीप्रमाणे हिरवा-पांढरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या २९१ ‘हिरकणी’ बस राज्यातील विविध मार्गांवर धावत आहेत.
दरम्यान, राज्य शासनाने डिझेल तीन हजार आणि पाच हजार ई-बस खरेदीचा निर्णय घेतला आहे.
अधिकारी म्हणतात, ‘आणखी विचार नाही’
‘हिरकणी’ आणि ‘लालपरी’ बसमधील भाडेदरातील तफावतीबाबत ‘सकाळ’ प्रतिनिधीने एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावर ‘या तफावतीबाबत एसटी महामंडळाने आणखी विचार केला नाही,” असे या अधिकाऱ्याने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर सांगितले.
बस प्रकार, मार्ग आणि भाडे
साधी ‘लालपरी’
- पुणे ते अकोला : ८२० रुपये
- स्वारगेट ते कोल्हापूर : ३८८ रुपये
‘हिरकणी’
स्वारगेट ते कोल्हापूर : ५२५ रुपये
पुणे ते अकोला : ११२५ रुपये












