दोन मित्रांसह बारा ज्योतिर्लिंग देवदर्शनासाठी गेलेल्या येथील तेजस देविदास दगडे (वय २६) या तरूणासह तिघा मित्रांचा गुजरातमधील धाधेला (जि. दाहोद, ता. लिमखेडा) येथील इंदूर-अहमदाबाद महामार्गावर दुभाजकाला वाहन धडकून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.तेजस दगडे आपल्या अभिषेक यादव (वय २६), सचिन बिरादार (वय २७) या दोन मित्रांसह गेली आठरा दिवसांपूर्वी बारा ज्योतिर्लिंग देवदर्शनासाठी आपल्या कारमधून गेले होते.
मंगळवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास धाधेला वळणावर त्यांची कार दुभाजकावर आदळून अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की वाहनाचे इंजिन तुटून दूरवर शेतात फेकले गेले होते.गाडीचाही चक्काचूर झाला. ही मोटार दुभाजकावर धडकल्यानंतर उलटून जवळच्या शेतात सुमारे २० फूट खोलवर कोसळली. त्यामध्ये दोघांचा जागीच तर एकाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
तेजसने तांत्रिक अभियांत्रिकी शिक्षण घेतले होते. मांजरी बुद्रुक येथे मंगल कार्यालयाचा व्यवसाय करीत होता. वडील पोलिस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाले आहेत.
परिसरात एक आदर्श व मनमिळावू म्हणून परिचित असलेल्या या कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तेजसवर आज दुपारी मांजरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.












