दरोड्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांच्या टोळीला वारजे माळवाडी पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, तलवार, तसेच मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. प्रतिक संजय हंकारे (वय १९), सुरज राणा गिरी (वय २३, रा.वडगाव शेरी), संस्कार युवराज एडके (वय १९), विशाल उत्तम वावळकर (वय २३), ऋत्विक राजू जंगम (वय १९, तिघे रा. वारजे माळवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिस कर्मचारी निखील तांगडे यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. लुटमार, दागिने हिसकाविणे अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वारजे भागातील श्री छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलावाजवळ चोरट्यांची टोळी दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून हंकारे, गिरी, एडके, वावळकर, जंगम यांना पकडले. त्यांच्याकडून कोयता, तलवार, मिरची पूड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराइत असून, त्यांच्याविरुद्ध गंभीर स्वरुपाचे गु्न्हे दाखल आहेत. पाेलीस उपनिरीक्षक संजय नरळे तपास करत आहेत.












