गजबजलेल्या सोमवार पेठ, रास्ता पेठ परिसरात भरदिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी रास्ता पेठेत भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील रोकड आणि सोन्याचे दागिने असा १४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.
याबाबत एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ महिला आणि कुटुंबीय रास्ता पेठेतील जैन हाईट्स सोसायटीत राहायला आहेत.
शनिवारी (२१ फेब्रुवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ज्येष्ठ महिला सदनिकाच बंद करुन बाहेर पडल्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून कपाटातील १७ हजारांची रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा १४ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. रात्री आठच्या सुमारास त्या घरी परतल्या. तेव्हा घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.
सहायक पोलीस निरीक्षक भागवत शेंडगे तपास करत आहेत.शहर परिसरात वर्षभरापासून भरदिवसा सदनिकचे कुलूप तोडून ऐवज चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोमवार पेठेतील खडीचे मैदान परिसरात गेल्या महिन्यात भरदिवसा सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ऐवज लांबविल्याची घटना घडली होती. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानंतर रास्ता पेठेत भरदिवसा घरफोडीचा प्रकार घडल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.












