गृहनिर्माण सोसायटीच्या ‘ड्राइव्ह वे’ मध्ये कचरा टाकू नका असे सांगितल्याच्या रागातून दोन जणांनी एका रहिवाशाला बेदम मारहाण केली. यामध्ये एकाचे बोट फ्रॅक्चर झाले आहे.
ही घटना डुडुळगाव परिसरातील एका सोसायटीत घडली.याबाबत ३४ वर्षीय तरुणाने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाप-लेका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे सोसायटीतील कचऱ्याच्या डब्यातील कचरा ‘ड्राइव्ह वे’ मध्ये फेकत होते. फिर्यादीने त्यांना तसे न करण्याबाबत हटकले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत खांद्यावर, पाठीत आणि हातावर मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीच्या उजव्या हाताच्या तर्जनीला गंभीर दुखापत झाली होती. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांचे बोट फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले. दिघी पोलीस तपास करत आहेत.
लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट चोरले
एका तरुणाने लहान मुलीच्या गळ्यातील सोन्याचे लॉकेट जबरदस्तीने चोरून नेल्याची घटना हिंजवडीतील फेज एक येथे घडली. या प्रकरणी किरण हनुमंत कांबळे (२२, शिंदेवस्ती, मारुंजी. मूळ- बोरसाभुरशी, चिखली, बुलढाणा) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी अमोल मोहन जाधव (२३, भक्तीशक्ती नगर, चिखली) याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलगीच्या गळ्यात अर्धा ग्रॅम वजनाचे सोन्याचे बदाम असलेले लॉकेट आणि काळ्या रंगाचा गोफ होता. आरोपी अमोल याने स्वतःच्या फायद्यासाठी ६ हजार रुपये किमतीचे हे दागिने जबरदस्तीने चोरून नेले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.












