पाचगणी : प्रमोद रांजणे दि. २४ फेब्रुवारी २०२६ :
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला जीवे मारण्याची तसेच फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या आरोपीस न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि १५ हजार रुपयांचा दंड अशी कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे परिसरात समाधानाची भावना व्यक्त होत असून, अल्पवयीनांवरील गुन्ह्यांविरोधात कडक कारवाईचा स्पष्ट संदेश गेला आहे.
दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी गु.र. नं. १३२/२०२३ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३७६(३), ५०६ तसेच POCSO कायदा २०१२ अंतर्गत कलम ४ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रमेश उर्फ रज्जा आप्पासाहेब याने अल्पवयीन पीडितेस घरात एकटी असताना जबरदस्तीने अत्याचार केला. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी देत तिचे फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे तपासात उघड झाले.
या प्रकरणाचा तपास महाबळेश्वर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. एस. के. भागवत यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सुनावणीदरम्यान अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्री. दयाराम एस. पाटील आणि सहायक सरकारी अभियोक्ता श्री. महेश उ. शिंदे यांनी प्रभावी युक्तिवाद सादर केला. माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय अहवाल व इतर पुरावे यांचा सखोल विचार करून आरोपीस दोषी ठरवत २० वर्षे सक्तमजुरी व १५,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
या तपासात पोलीस अधीक्षक श्री. तुषार जोशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनीिल सानप यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच वाई विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार, कोर्ट पेअरवी अधिकारी श्री. मुजावर कोळे व इतर अधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
न्यायालयाच्या निर्णयानंतर पाचगणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. दिलीप पवार यांनी समाजाला ठाम संदेश दिला:
“समाजासाठी हे कठोर वास्तव आहे. अनेक गुन्हे अजूनही दबले जातात. बदनामीच्या भीतीने तक्रारी मागे घेतल्या जातात. आरोपींच्या धमक्यांमुळे पीडित कुटुंबे गप्प बसतात. ही साखळी तोडायची असेल तर प्रत्येक नागरिकाने आवाज उठवला पाहिजे. शाळा, पालक, समाजसंस्था आणि प्रशासन — सर्वांनी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. हा निर्णय सांगतो — ‘कायद्याचा हात लांब आहे आणि तो निर्दयी आहे.’”
श्री. पवार यांनी नागरिकांना आवाहन केले की कोणताही गुन्हा लपवू नये किंवा भीतीपोटी मागे हटू नये. पोलिस प्रशासन पीडितांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











