वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
धोम : नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती व लाभ एकाच ठिकाणी मिळावा या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या वतीने वाई तालुक्यात विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. शनिवार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता नरसिंह हायस्कूल, धोम येथे ‘विधी सेवा व शासकीय योजनांसाठी महाशिबीर आयोजित करण्यात आला आहे. या महाशिबीराचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयातील माननीय न्यायमूर्ती यांच्या हस्ते होणार असून नागरिकांना मोफत कायदेशीर मार्गदर्शन देण्यात येणार आहे. विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात येणार आहेत. महिला, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांसाठी असलेल्या विविध योजनांबाबत मार्गदर्शन केले जाणार असून काही सेवांसाठी तात्काळ अर्ज करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच आधार कार्ड, आयुष्मान कार्ड आदींची नोंदणी व अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून रक्तदाब व मधुमेह तपासणी तसेच मोफत औषधोपचाराची सोय करण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवार दि. २४ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या सचिव श्रीमती एन. एन. बेदरकर, दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) श्री. ए. जी. देशमुख व श्री. ए. ए. पाचरणे, तसेच दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) श्री. आर. एम. भेंडे व श्री. व्ही. बी. शेट्टी यांनी नरसिंह हायस्कूल येथे भेट देऊन महाशिबिराच्या तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी करण्यात येणाऱ्या व्यवस्था, विविध विभागांच्या स्टॉलची मांडणी, नोंदणी कक्ष, नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था, पार्किंगची सुविधा तसेच आरोग्य तपासणी विभागाची पाहणी करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्रम सुयोग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.
महाशिबिरास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तसेच नागरिकांना शासकीय योजनांची माहिती सोप्या पद्धतीने मिळावी यासाठी प्रत्येक विभागाने स्वतंत्र माहिती कक्ष उभारावेत, असेही सांगण्यात आले. यावेळी नरसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक देसाई सर व शाळेचा संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होता. तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महाशिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा माननीय श्री. अरविंद शं. वाघमारे साहेब यांनी केले आहे.











