वीस रुपये देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एकावर चाकूने जीवघेणा हल्ला केला. ही घटना मंगळवारी (२४ फेब्रुवारी) रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या ३८ युवकाने याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपरी येथे गेले असता आरोपीने त्यांच्याकडे २० रुपये मागितले. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी संतापला. आरोपीने खिशातील चाकू काढून फिर्यादीच्या गळ्यावर आणि मानेला वार केला.
तसेच उपस्थित नागरिकांना चाकू दाखवत धमकावत दहशत माजवली. “तुम्हा सर्वांना खल्लास करीन” अशी धमकी देत आरोपीने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.












