चिंचवड परिसरात नवीन व्यवसाय सुरू करून देण्याचे आणि स्वस्त दरात प्लॉट देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची आणि तिच्या पतीची २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना महात्मा फुलेनगर येथे घडली. या प्रकरणी महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील आणि भाऊ असलेल्या आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला.
त्यांनी नवीन व्यवसाय व पतसंस्था टाकण्याचे आश्वासन दिले, तसेच २५ लाख रुपये भरल्यास एक गुंठा प्लॉट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या पतीने वेळोवेळी २३ लाख रुपये आणि भावाच्या खात्यात २ लाख रुपये ऑनलाईन असे एकूण २५ लाख रुपये ऑनलाइन जमा केले.
मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी कोणताही व्यवसाय सुरू करून दिला नाही किंवा प्लॉट नावावर केला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली. चिखली पोलीस तपास करत आहेत.












