दरम्यान, नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार मनोज नागराज कट्टीमणी याच्यावर पोलिसांनी ‘एमपीडीए’ कायद्यान्वये कडक कारवाई केली आहे.
त्याला एका वर्षासाठी अमरावती मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मनोज कट्टीमणी हा समर्थ आंगण सोसायटी, भैरवनाथ नगर, किरकटवाडी (ता. हवेली) येथील रहिवासी असून तो पुणे पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे.
2021 पासून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, शिवीगाळ व धमकी देणे, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा स्वरूपाचे एकूण पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
अनेक नागरिक भीतीपोटी तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. पोलिसांनी यापूर्वी प्रतिबंधक कारवाई केली होती; मात्र त्याच्या वर्तनात कोणतीही सुधारणा होत नसल्याने अखेर त्याच्यावर ‘एमपीडीए’ अंतर्गत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. नांदेड सिटी पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून गुन्हेगारीविरोधातील पोलिसांची भूमिका अधिक ठाम झाल्याचे दिसून येत आहे.












