वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे
वाई : ‘फँड्री: भारतीय चित्रपटातील मैलाचा दगड’ या गाजलेल्या समीक्षात्मक पुस्तकाचे लेखक प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे यांची ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत किसन वीर महाविद्यालय, वाई येथे विशेष मुलाखत घेण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी त्यांच्याशी संवाद साधत पुस्तक, चित्रपट आणि साहित्य याविषयी सखोल चर्चा केली. जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजी विभागाने सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले. प्रा. डॉ. अंबादास सकट यांनी प्रास्ताविक केले. मराठी विभागातील सहा. प्रा. सुमती कांबळे यांनी लेखकाचा परिचय करून दिला.
प्रा. सुमती कांबळे यांनी सदर उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांना लेखकांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या मुलाखतीत प्रा. ज्ञानदेव झांबरे (विभागप्रमुख, रसायनशास्त्र विभाग, किसन वीर महाविद्यालय वाई), प्रा. डॉ. अंबादास सकट (विभागप्रमुख, इंग्रजी विभाग, किसन वीर महाविद्यालय वाई), डॉ. धनंजय साठे (इंग्रजी विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर), डॉ. रमेश लांडगे (इंग्रजी विभाग, कालिकादेवी महाविद्यालय, शिरूर कासार), डॉ. शिवाजी कांबळे (ग्रंथपाल, किसन वीर महाविद्यालय वाई), डॉ. कुबेर गायकवाड (इंग्रजी विभाग, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर), डॉ. सिद्धार्थ काळे (इंग्रजी विभाग, नौरोसजी वाडिया कॉलेज, पुणे) तसेच सहा. प्रा. जयवंत खोत (इंग्रजी विभाग, किसन वीर महाविद्यालय वाई) यांनी सहभाग घेत विविध प्रश्न विचारले.
प्रा. डॉ. हनुमंत लोखंडे यांनी ‘फँड्री’ या चित्रपटाच्या सामाजिक आशयावर, भारतीय चित्रपटसृष्टीतील त्याचे महत्त्व तसेच या विषयावर पुस्तक लिहिण्यामागील प्रेरणा याविषयी सविस्तर माहिती दिली. साहित्य, समाज आणि चित्रपट यांचे नाते स्पष्ट करत त्यांनी उपस्थितांशी मनमोकळा संवाद साधला. या कार्यक्रमामुळे प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना एका अभ्यासू लेखकाच्या विचारांची जवळून ओळख करून घेण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. प्रा. संतोष मुळीक यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.











