माय मराठी…
हे मायमराठी, तू उतरलीस माझ्या वाणीत ओतप्रोत,
म्हणूनच जगण्याला एक सुंदर दिशा मिळाली.
तुझी अक्षरे गिरवताना मन आनंदून जाते,
आणि शब्दांच्या पलीकडचेही शब्द
माझ्या बोटांतून अवतरू लागतात.
मायमराठी, हा संसारही चालतोय तुझ्याच जीवावर;
मान-सन्मानाची सारी सूत्रे
तुझ्यापासूनच उगम पावलेली.
जीवनात उभा राहण्यासाठी
तूच आधारवड झालीस—
किती मोठे आहेत तुझे उपकार!
तुझ्या शब्दांची फुले तुलाच अर्पण करताना
कधी आयुष्याच्या मध्यावर आलो,
हेही कळले नाही.
वाचनात, भाषणात, गाण्यात, व्याख्यानात,
आचरणात आणि कवितेतही
तूच पाठराखण केलीस,
म्हणून हा प्रवास इतका सुखकर झाला.
मायमराठी, तुझी ही साथ
कधीच सुटणार नाही.
तुझी सेवा करण्यातच
मी माझे भाग्य मानेन.
कारण शब्दांचे चांदणे
माझ्या ओंजळीत भरताना
तू कधीच कमी पडली नाहीस.
मायमराठी,
तुझेच शब्द पेरत राहीन मी,
तुझ्यातूनच कणाकणांनी फुलेन मी,
आणि तुझ्यासाठीच
माझे ‘मी’पणही अर्पण करीन मी.
— कवी जगदीश ✍️












