पाचगणी प्रतिनिधी : प्रमोद रांजणे
हॅपी अवर्स हायस्कूल, पाचगणी येथे राष्ट्रीय विज्ञान दिन जल्लोषात साजरा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त हॅपी अवर्स हायस्कूल, पाचगणी येथे विज्ञान प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आले. शाळेचा संपूर्ण परिसर विज्ञानमय वातावरणाने भारावून गेला होता. विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना, प्रयोग आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेच्या विश्वस्त सौ. सना लतिफ नॅन्सी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना भेट देत त्यांच्या मेहनतीचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. हायड्रोलिक रोबोट, जंपिंग मॅन, भूकंप शोधक, मॅग्नेटिक कार, सोलर पॅनलचे उपयोग, रेन डिटेक्टर, पाणी साठवण प्रकल्प, प्लास्टिक पुनर्वापर अशा विविध विषयांवरील प्रकल्पांनी उपस्थितांची मने जिंकली.
प्रत्येक प्रकल्पामधून विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि विज्ञानाबद्दलची आवड स्पष्ट दिसून आली. शाळेचे मुख्याध्यापक श्री. नितीन एन. प्रभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सैफुल्ला वारणे सर ,स्नेहा सपकाळ व सर्व वर्गशिक्षकांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विज्ञानाची ताकद प्रभावीपणे सादर केली. कार्यक्रमाचा समारोप केदार कारंजकर यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात वैज्ञानिक दृष्टीकोन अधिक दृढ झाला असून, “विज्ञान म्हणजे भविष्याची दिशा” हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला.












