होळी हा केवळ रंगांचा सण नसून, तो मनामनातील दुरावा मिटवून नात्यांमधील ओलावा जपण्याचा आणि आनंदाची उधळण करण्याचा सण आहे. आयुष्यातील सर्व दुःख आणि चिंता विसरून आनंदाच्या रंगात न्हाऊन निघणे, हेच या सणाचे खरे सार्थक असल्याची भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
यंदाची होळी त्यांनी Central Industrial Security Force (CISF) च्या जवानांसोबत साजरी करत सणाचा द्विगुणित आनंद लुटला. देशाच्या कानाकोपऱ्यातून, विविध राज्यांतून कर्तव्य बजावण्यासाठी आलेले हे जवान आपल्या घरापासून मैलोन् मैल दूर राहून राष्ट्रसेवेची जबाबदारी पार पाडत आहेत. अशा ‘वर्दी’तील भावांसोबत रंगांची उधळण करताना एक वेगळाच भावनिक क्षण अनुभवायला मिळाला, असे त्यांनी सांगितले.
यावेळी मंत्री पाटील यांनी जवानांना होळीच्या शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला. देशसेवेसाठी स्वतःच्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या जवानांच्या त्यागाची जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. जवानांच्या चेहऱ्यावर उमटलेला निखळ आनंद आणि समाधान पाहून मन भरून आले. ते खऱ्या अर्थाने माझ्या कुटुंबाचाच एक अविभाज्य भाग बनले आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सणांच्या माध्यमातून समाजात ऐक्य, बंधुभाव आणि आपुलकीची भावना दृढ होते. होळीचा संदेश हा केवळ रंगांपुरता मर्यादित नसून, तो प्रेम, सद्भावना आणि एकतेचा आहे. समाजातील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येत आनंद साजरा करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या उत्साही वातावरणात जवानांनीही रंगांची उधळण करत मंत्री पाटील यांच्यासोबत होळी साजरी केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजऱ्या झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये उत्साह आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ झाली.












