‘पुणे ग्रॅंड टूर सायकल स्पर्धे’साठी शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजवून चेंबरची झाकणे समपातळीवर आणण्याचे काम महापालिकेने युद्धपातळीवर केले. मात्र, अद्यापही शहर आणि उपनगरांमधील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर चेंबरभोवतीच्या खड्ड्यांची समस्या कायम आहे.
रस्त्यांवरील चेंबरभोवतीच्या खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जाण्याची वेळ आली असून, पावसाळ्यात महापालिकेचा कस लागण्याची शक्यता आहे. तरीही, चेंबरची झाकणे समपातळीवर आणण्याच्या कामास गती मिळत नसल्याची चिन्हे आहेत.पावसाळ्यात शहरातील खराब रस्ते, त्यावर साठणारे पाणी आणि निर्माण होणारी वाहतूक कोंडी यावरून मोठ्या प्रमाणात महापालिकेला टीकेला सामोरे जावे लागले होते.
पावसाळा संपल्यानंतर महापालिकेकडून रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, शहरातील प्रमुख रस्त्यावरून जाणाऱ्या ‘पुणे ग्रॅंड टूर सायकल स्पर्धे’साठी महापालिकेने चांगल्या दर्जाचे रस्ते तयार केले.विशेषतः चेंबरभोवतीच्या खड्ड्यांची विशिष्ट पद्धतीने दुरुस्ती करून चेंबरची झाकणे रस्त्यांच्या समपातळीला आणण्यात आली होती. त्यामुळे पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता.
रस्त्यांवरील खड्डे, चेंबरभोवतीचे खड्डे कमी झाल्याने वाहतुकीलाही गती मिळण्यास सुरुवात झाली होती.दरम्यान, पुणे ग्रॅंड टूर सायकल स्पर्धेसाठी प्रमुख रस्ते उत्कृष्ट झाले, मात्र शहराच्या मध्यवर्ती भागांमधील पेठा, उपनगरे, समाविष्ट गावांमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्त्यांची अद्यापही दुरवस्थाच आहे.
सूस, बाणेर, पाषाण, बावधन, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, धायरी, आंबेगाव, कात्रज, बिबवेवाडी, सहकारनगर, धनकवडी, कोंढवा, महम्मदवाडी, हडपसर, मुंढवा, वडगाव शेरी, लोहगाव, येरवडा, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, बोपोडी, औंध या परिसरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर चेंबरभोवती खड्डे कायम आहेत.महापालिकेकडून काही भागात दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, संबंधित कामांना गती नसल्याने ते कामे पावसाळ्यापूर्वी तरी पूर्ण होणार का? असा प्रश्न आहे.
मुख्य विभागच करणार दुरुस्ती
शहरातील प्रमुख रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पथ विभागाकडून केले जाते; तर अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे क्षेत्रीय कार्यालयांमार्फत केली जात होती. खड्डे दुरुस्तीच्या तक्रारी कमी होत नसल्याने अखेर महापालिकेने रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे क्षेत्रीय कार्यालयांकडील काम पथ विभागाकडे सोपविले आहे.
चेंबर समपातळीवर आणण्याच्या कामांची स्थिती
अंदाजे ४८ हजारांपेक्षा जास्त
रस्त्यांवरील चेंबरभोवतीच्या खड्ड्यांची संख्या
२०००
पुणे ग्रॅंड टूर स्पर्धेवेळी चेंबर समपातळीला आणण्याची झालेली कामे
४७३
फेब्रुवारी महिन्यात
समपातळीला आणलेले चेंबर
१० हजार
मे अखेरपर्यंत समपातळीला
आणण्यात येणारे चेंबरर
स्त्यांवरील चेंबरभोवतीच्या खड्ड्यांमुळे दुचाकी वाहन घसरून पडण्याच्या घटना घडतात. मोठी किंवा अवजड वाहने आजूबाजूला असल्यास एखाद्या दुचाकीस्वाराचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे चेंबरभोवतीचे खड्डे दुरुस्तीचे काम तातडीने होणे गरजेचे आहे.












