डी मार्टजवळील महापालिकेच्या मैदानाला काही तरुणांनी ‘रेसिंग ट्रॅक’च बनविला असून सायंकाळच्या सुमारास मोटारींची धोकादायक स्टंटबाजी केली जात आहे. वेगाने मोटारी फिरवणे, गोल फिरवून टायर घासणे (ड्रिफ्टिंग), मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणे, अशा प्रकारांमुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हे मैदान मुलांच्या खेळासाठी आणि नागरिकांच्या व्यायामासाठी राखीव आहे. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांपासून येथे रात्री उशिरापर्यंत मोटारींची ये-जा वाढली असून काही जण मुद्दाम स्टंट करून परिसरात दहशत निर्माण करत आहेत. टायर घासल्यामुळे निर्माण होणारा मातीचा धुराळा, धूर आणि मोठ्याचा आवाजाचा ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना त्रास होत आहे.
आम्ही रोज सकाळी येथे चालायला येतो. मैदानाची शांतता भंग होत आहे. प्रशासनाने येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवून नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या एका सदस्याने केली.
आमची मुले संध्याकाळी खेळायला येतात. पण मोटारी वेगाने फिरवल्या जात असल्याने भीतीचे वातावरण आहे. एखादा अपघात झाला, तर जबाबदार कोण राहील ?- मीनल देशमुख, स्थानिक नागरिक
हे मैदान सार्वजनिक आहे. काही तरुणांनी ते रेसिंग ट्रॅक बनवले आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा.- संदीप जगताप, स्थानिक रहिवासी
नागरिकांच्या मागण्या
– स्टंटबाजीला त्वरीत आळा घालावा
– सुरक्षा फलक लावणे
– नियमित पोलिस गस्त ठेवावी.












