वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई : पसरणी गावातील कारभारी घराण्यातील श्री. मनोज गुलाबराव महांगडे (कारभारी) यांचे चिरंजीव कुमार अथर्व मनोज महांगडे (वय १६) यांचे आज सकाळी पाण्यात पोहत असताना अचानक चक्कर आल्याने दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण पसरणी गावावर शोककळा पसरली आहे.
अथर्व हा पसरणी विद्यालयामध्ये इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता. तो अत्यंत हुशार, नम्र व क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवणारा होतकरू विद्यार्थी होता. तालुका व जिल्हा स्तरासह इतर राज्यांमध्येही विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत त्याने अनेक पदके मिळवली होती. विशेष म्हणजे आजच त्याचा दहावीचा पेपर होता; मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते.
अथर्वची आई रयत शिक्षण संस्थेच्या जावळी तालुक्यातील हुमगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असून वडील बँकेत सेवेत आहेत. त्याच्या अकाली निधनामुळे महांगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार व गावकऱ्यांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
अथर्वच्या अचानक जाण्याने संपूर्ण पसरणी गाव शोकमग्न झाले असून सर्व स्तरातून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. ईश्वर त्याच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, अशी प्रार्थना व्यक्त केली जात आहे.











