हडपसर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला आणखी एक वर्ष कारावास भोगावा लागणार आहे.
कुंडलिक गुलाबराव जाधव (वय ४०, रा. महंमदवाडी, हडपसर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीवर २७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड यांनी केला. त्यानंतर पोलिस अधिकारी संदीप वरपडे यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता मिलिंद दातरंगे यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला.सुनावणीअंती प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. महाजन यांनी आरोपीला ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत दोषी ठरवत २० वर्षे सक्त मजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या प्रकरणात दोषसिद्धीसाठी पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, साहाय्यक आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ निरीक्षक भाऊसाहेब पाटील आणि पोलिस निरीक्षक (गुन्हे) संगीता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अंमलदार दिनेश जाधव यांनी साक्षीदार व पुरावे न्यायालयात सादर केले.












