वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत सहा वाहनांना धडक दिली. यामुळे झालेल्या अपघातात वाहनांचे नुकसान झाले तसेच तीनजण जखमी झाले. ही घटना काळेवाडी फाटा सिग्नल येथे रविवारी घडली. याप्रकरणी एका महिलेसह अल्पवयीन मुलावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. याबाबत ३५ वर्षीय व्यक्तीने काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने चालवत वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष केले. त्याने दुचाकी, मोटार आणि रिक्षासह एकूण सहा वाहनांना धडक दिली.
या अपघातात तीनजण जखमी झाले असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महिला आरोपीने अल्पवयीन मुलाकडे कोणताही वाहन चालविण्याचा परवाना नसताना तसेच त्याच्याकडून अपघात होण्याची शक्यता असतानाही त्यास टेम्पो चालविण्यास दिल्यामुळे तिच्या विरोधातही गुन्हा दाखल करीत त्या महिलेला अटक करण्यात आली आहे. काळेवाडी पोलीस तपास करत आहेत.












