क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक, भाडे नाकारणे, व्यवसायास अपात्र असलेल्या रिक्षा, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे या प्रकरणी वाहतूक पोलिस आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) तीन दिवसात स्वारगेट येथील जेधे चौकात ३७५ रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई केली.
या कारवाईत तांत्रिकदृष्ट्या व्यवसाय करण्यास अपात्र असलेल्या दहा रिक्षाही जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे स्वारगेट चौकातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे.
बेशिस्तपणे स्वारगेट एसटी स्थानकातील प्रवेशद्वाराच्या परिसरात रिक्षा लावण्यात आल्याने या भागातील वाहतूक विस्कळीत होऊन कोंडी होते. येथे एसटी बसचा थांबा, पीएमपी, तसेच मेट्रो स्थानक आहे.
प्रवाशांची वर्दळ असलेल्या या स्वारगेट चौकात बेशिस्तपणे रिक्षा चालक व्यवसाय करतात. स्थानकाच्या परिसरात रिक्षा लावण्यात येत असल्याने वाहतूक विस्कळीत व्हायची.या वाहतूक कोंडीतून वाट काढत प्रवाशांना या भागातून जावे लागायचे.
याबाबत तक्रारी करण्यात आल्यानंतर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट वाहतूक विभागाच्या सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीसागर आणि पथकाने या परिसरात कारवाईची विशेष मोहीम राबविली.












