वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे
वाई, दि. १५ : पसरणी व पश्चिम भागातील नागरिकांचे महसूल विषयक प्रश्न सोडविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात विविध दाखल्यांचे वाटप व प्रलंबित कामांचा निपटारा करण्यात आला. वाई महसूल विभागाच्या वतीने पसरणी येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दुर्गम भागातील नागरिकांना महसूल कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागू नयेत, या उद्देशाने आयोजित या शिबिरात उत्पन्न, रहिवासी, जात प्रमाणपत्र तसेच नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्रांचे जागीच वाटप करण्यात आले. तसेच प्रलंबित फेरफार नोंदी, ७/१२ उताऱ्यावरील त्रुटींची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे उतारे आणि शैक्षणिक कामांसाठी आवश्यक असणाऱ्या मोफत दाखल्यांचे वितरणही करण्यात आले. यावेळी वाई पंचायत समितीचे सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी प्रशासनासमोर स्थानिक समस्यांचा पाढा मांडत पाणंद रस्त्यांचे प्रश्न, रेशनिंग कार्डाशी संबंधित अडचणी तसेच कुणबी दाखले मिळवताना नागरिकांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.
सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असून महसूल विभागाने कुणबी दाखल्यांच्या प्रक्रियेत अधिक सुलभता आणणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले. यावर उत्तर देताना तहसीलदार सोनाली मिटकरी यांनी नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. येणाऱ्या काळात महसूल विभागाकडून सर्व त्रुटींचे निरसन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ नेते अशोकराव बापू गायकवाड, सरपंच हेमलता गायकवाड, नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, अमोल मर्ढेकर, माजी सरपंच राजेंद्र शिर्के, यादव आबा महांगडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पसरणी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











