वाई प्रतिनिधी | प्रशांत थोरवे
वाई, दि. १६ : वाई तालुका शिक्षण विभागाचा डोलारा समर्थपणे सांभाळणारे कार्यक्षम अधिकारी हर्षवर्धन मोरे यांची वाई तालुका गटशिक्षणाधिकारी पदी कायमस्वरूपी पदस्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झाल्यानंतर गेल्या आठ महिन्यांपासून ते परिविक्षाधीन कालावधीत येथे कार्यरत होते. त्यांच्या कायम नियुक्तीमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोरे यांची कार्यपद्धती, शाळांना दिलेला वेगवान प्रतिसाद आणि शिक्षकांशी असलेला सुसंवाद लक्षात घेता त्यांची वाई तालुक्यातच कायम पदस्थापना व्हावी, अशी मागणी वाई तालुका शिक्षक संघाने केली होती. शिक्षक संघाच्या या मागणीची दखल घेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दादा भुसे यांना विशेष शिफारस पत्र दिले होते. या पाठपुराव्यानंतर शासनाने मोरे यांच्या कायम नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.
या निर्णयाचे स्वागत करत वाई तालुका शिक्षक संघाच्या वतीने हर्षवर्धन मोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार प्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव, सरचिटणीस दत्तात्रय गोळे, ज्येष्ठ नेते महेंद्र इथापे, भास्कर पोद्दार, सहदेव फणसे, सुशांत मोतलिंग, कार्याध्यक्ष विशाल जरंडे, राहुल हावरे, प्रसिद्धीप्रमुख अमोल माने, उपाध्यक्ष सुनील गायकवाड, फुलचंद महांगडे, किरण पवार, ज्ञानेश्वर धायगुडे, नवनाथ भांगरे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना शिक्षक संघाचे अध्यक्ष विजय जाधव म्हणाले, “मोरे साहेबांच्या कायम नियुक्तीमुळे वाई तालुक्यातील प्रलंबित शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील आणि प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता येईल.
त्यांच्या नियुक्तीसाठी शिक्षक संघाने केलेल्या मागणीला न्याय मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे.” हर्षवर्धन मोरे यांच्या रूपाने एक अभ्यासू व संयमी अधिकारी वाई तालुक्याला कायमस्वरूपी लाभल्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.











