उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृती जपत असताना, आदर अधिक सुसंगतपणे व्यक्त व्हावा, यासाठी बॅनर्स, जाहिराती तसेच घर किंवा कार्यालयात लावण्यासाठी अजितदादा पवार यांचे एकच अधिकृत छायाचित्र वापरण्याचे आवाहन खासदार पार्थ पवार यांनी केले आहे.
समाजमाध्यमावर या बाबत पार्थ पवार यांनी आवाहन केले आहे. या बाबतच्या निवेदनात ते म्हणतात, अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या कार्याची आठवण ठेवून एकसंधतेने आदर व्यक्त करावा, आयुष्यभर शिस्त, समर्पण आणि विकासाचा ध्यास घेत त्यांनी महाराष्ट्राची सेवा केली.
त्यांच्या कार्यातून निष्ठा, कर्तव्यभावना आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी समाजाला प्रेरणा देणारी ठरली आहे.हीच एकसंधता, शिस्त आणि भावना दादांना खरी आदरांजली ठरेल, त्यांच्या विचारांना कृतीत उतरवत त्यांच्या कार्याचा वारसा जपण्याचे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकदिलाने पुढे जाण्याचे आवाहनही पार्थ पवार यांनी केले आहे.












