युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा सामाजिक माध्यमांवर काल, सोमवारी रात्री पसरल्याने शिर्डी, राहातासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी रात्रीपासूनच लांबच लांब रांगा लागल्या होत्या.आज, मंगळवारी सकाळपासुन बहुतांशी पंपावर इंधनसाठा शिल्लक नसल्याचे फलक लागल्याचे दिसून आले.
पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही, अशी अफवा सामाजिक माध्यमांवर वेगाने पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल पंपांकडे धाव घेतल्याने आज मोठा गोंधळ उडाला. शहरासह तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.अनेक ठिकाणी वाहनधारकांमध्ये इंधन भरण्यासाठी चढाओढ दिसून आली.
काही ठिकाणी किरकोळ वादाचेही प्रकार घडले. काल रात्री पेट्रोल पंप बंद झाल्याने इंधन भरण्यासाठी आज सकाळीच नागरिकांनी विविध ठिकाणी गर्दी केल्याने शिल्लक असलेल्या बहुतांश पंपचालकांनी पेट्रोल व डिझेल शिल्लक नसल्याचा फलक दर्शनी भागात लावल्याने दुपारपासून अनेकजण पंपांसमोर चकरा मारीत असल्याचे आढळले.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विशेषतः व्यावसायिक गॅसच्या तुटवड्याच्या बातम्यांमुळे पेट्रोल आणि डिझेलबाबतही संभ्रम वाढला आहे. यामुळेच नागरिकांनी खबरदारी म्हणून वाहनांमध्ये इंधन साठवण्याचा प्रयत्न केल्याचे चित्र दिसून आले.
पेट्रोल पंप चालकांनी मात्र या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.सध्या पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. पुरवठा नियमित सुरू आहे, असे पंप चालकांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी टँकर उशिरा पोहोचल्याने तात्पुरती अडचण निर्माण झाली असली तरी ती तुटवड्याची परिस्थिती नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच इंधन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी काही नवीन नियम लागू केल्याने वितरण प्रक्रियेत थोडा विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे.
मात्र, याचा दीर्घकालीन तुटवड्याशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अफवांमुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे प्रशासनाने नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. अनावश्यक गर्दी टाळून अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असेही सांगण्यात आले आहे. सध्या तरी इंधनाचा कोणताही वास्तविक तुटवडा नसतानाही केवळ अफवांमुळे निर्माण झालेली ही परिस्थिती प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
डिझेलच्या तुटवड्यासंदर्भात प्रशासनाकडून कोणती अधिकृत घोषणा झालेली नाही. साठा पुरेसा असून पेट्रोल डिझेलचे दर वाढणार, इंधनपुरवठा खंडित होणार या अफवांमुळे नागरिकांनी अचानक पंपांवर गर्दी केली त्यामुळे कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. नागरिकांनी अफवांवर ठेवू नये अथवा घाबरून जाऊ नये, एकाचवेळी गर्दी केल्यामुळे यंत्रणेवर ताण येत असल्याने नागरिकांनी शांतता ठेवावी. रविवारी डेपोला सुट्टी असल्यामुळे काल टँकर उशिरा भरल्याने पंपावर पोहोचण्यास वेळ लागत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवा विश्वास न ठेवता अतिरिक्त पेट्रोल डिझेलचा साठा करून ठेवू नये.












