पुणे, दि. 28 मार्च 2026 – ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनधिकृत जाहिरातफलकांवर कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून, आज मुंढवा येथील ताडीगुत्ता चौकात मोठ्या जाहिरातफलकावर धडक कारवाई करण्यात आली.
ही कारवाई मा. उपआयुक्त माधव जगताप, मा. सहायक आयुक्त धुमाळ साहेब तसेच अधीक्षक निम्हण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. धडक कारवाई पथक क्रमांक 2 चे उपअधीक्षक आनंद केमसे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली.
या कारवाईत मुंढवा परिसरातील ताडीगुत्ता चौकात उभारण्यात आलेला सुमारे 30×20 आकाराचा अनधिकृत जाहिरातफलक हटविण्यात आला. या मोहिमेत महेश पवार, स्वागत शेंडगे आणि विनोद लांडगे (परवाना निरीक्षक) यांनी सक्रिय सहभाग घेतला.
महानगरपालिकेच्या नियमांचे उल्लंघन करून उभारण्यात येणाऱ्या अनधिकृत जाहिरातफलकांवर अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच नागरिकांनी व व्यावसायिकांनी नियमांचे पालन करूनच जाहिराती लावाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
ही कारवाई स्थानिक परिसरात शिस्त व सुरक्षितता राखण्यासाठी महत्त्वाची ठरत असून, अशा मोहिमेमुळे शहरातील अनधिकृत बांधकामे आणि फलकांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.












